# @pdheringe on Instagram

- **Type:** Image
- **Original URL:** https://www.instagram.com/p/DRzvGLHkjlf
- **Gondola URL:** https://gondola.cc/posts/63337286-pdheringe-instagram
- **Thumbnail:** https://img.gondola.cc/tr:w-,h-,fo-auto/postThumbnails/1f694840cc.jpg
- **Posted:** 2025-12-03T16:41:12.000+00:00
- **Account Owner:** Pooja Dheringe (@pdheringe) — https://gondola.cc/pdheringe

## Caption

पहाटे उठणं आताशा होत नाही. तुम्ही म्हणाल थंडी आहे पण नाही आदल्या दिवशीचे ओझे घेऊन झोपायची सवय लागल्यामुळे होत असावं. हे माझं एकटीचं नाही हा! आताच्या पिढीची ही खंतच आहे. पण ट्रेकिंगला किंवा फिरायला जायचे असेल तर अलार्म न लावता उठणारी पिढी आहे ही ! 
खरं सांगायचं तर आताच्या पिढीकडे करण्यासारखे खूप आहे. नवनव्या संधी आहेत आणि त्यामुळेच त्यांना एकावेळी अनेक गोष्टी करण्याचा किडा चावला आहे. त्यामुळे ही दमछाक साहजिक आहे. 
पण या धावपळीत एक गोष्ट वारंवार आणि जास्त प्रमाणात घडताना दिसू लागली ती म्हणजे लोकांचं ट्रेकिंग करणं आणि योगायोगे महाराजांचे गडकिल्ले पाहणं होऊ लागलंय… ते म्हणताय (म्हणजे जी लोकं जात नाहीत) 
“रिल्सच्या जमण्यात फोटो, शुटिंगसाठी जाताय. त्यांना काय इतिहासाचे”
तेव्हा विचार केला, समजा ते गेले नसते तरीही बोललेच असते आणि जाताय तेव्हाही बोललेच जातेय. त्यामुळे ही दर्दी आणि गर्दींची गर्दी कोणीही थांबवू तर शकणार नाही. त्यामुळे आहे ते स्वीकारून त्यात सकारात्मक बाजू पाहणं गरजेचं आहे. 
त्याच या काळात आम्ही रतनगडला जाऊन आलो. अनेकजण या गडाला सह्याद्रीचे रत्न म्हणतात. तिथे जाण्यापर्यंतचा ट्रेक हा एखादं रत्न मिळवण्यासाठी करावा तेवढा मेहनतीचा आहे. पण त्रंबक दरवाजाला पोहोचलो की या रत्नाची खाण चकाकते. दरवाजांची जुनी ठेवण, त्यावर निसर्गाच्या गवताने मारलेली मिठी आणि सह्याद्रीच्या कातळ कड्यांनी भक्कमपणे धरलेला हात … हे सगळच सुखावून जातं. 
कदाचित मागच्या काही पिढ्यांनी गड किल्ल्यांवर ती शांत हवा अनुभवली असेल तेही कुठल्याच कलकलाटाशिवाय ! गडाच्या एखाद्या काताळावर डोके टेकवून आभाळाच्या डोळ्याशी गूज करत शरीराला मोकळ्या हवेचा गंध देऊन मनाची सगळी वाताहत थांबवली असेल. पण आमच्या वाट्याला आलय ते काय कमी नाही! 
गर्दीचा लोट आहे पण त्यांच्यात अनोळखी असून संवाद आहे. सोशल गॅदरिंग- नेटवर्किंग सगळं इथेच होतं. अनेकांच्या ओव्हरथिंकिंग, ताणतणाव, डिप्रेशन, नैराश्य या सगळ्यांचं औषध आहे ही सह्याद्री आणि बऱ्याचदा इथली ही गर्दीही! कारण प्रत्येकाला शांतता नको असते. अनेकांना कॉमन आवड असलेल्या लोकांना भेटायला आवडते आणि अशांसाठी गड किल्ले भ्रमंती जिव्हाळ्याचा विषय असतो. मान्य आहे गडांवर कचरा टाकणे, तेथील वस्तूंना हानी पोहोचवणे अशी करणारी जनताही आहे पण दुसऱ्या बाजूस याच गड किल्ले संवर्धनासाठीही पुढाकार घेणारी तरुणाई आहे. त्यामुळे मागच्या आणि आताच्या पिढीच्या चांगल्या वाईट गोष्टी दूर ठेवून गड भ्रमंती करणे आणि काहीतरी वेचून घेणे एवढं आपल्या हातात आहे. 
- पूजा ढेरिंगे 
#ratangad #ratangadtrek #रतनगड

## Stats

- **Views:** 0
- **Likes:** 5,746
- **Shares:** 0
- **Comments:** 29

## Tags

रतनगड, ratangadtrek, ratangad

---
Copyright (c) Gondola